समृद्धी कारखाना अल्पभूधारक शेतकऱ्यांना करणार 'जल समृद्ध' : विहरीसाठी देणार पन्नास टक्के अर्थसहाय्य.
घनसावंगी: घनसावंगी मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेती समृद्ध करण्यासाठी समृद्धी शुगर्सचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांनी अल्पभूधारक ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी पन्नास टक्के अर्थसहाय्य देण्यासाठी योजना सुरु केली आहे. या योजनेतून विहीर खोदणाऱ्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी यासाठी शासनाच्या योजनेतून 'सौर कृषी पंप' आणि बाराही महिने पाणी उपलब्ध राहण्यासाठी 'मागेल त्याला शेततळे' योजनेतून शेत तळ्याचा लाभ प्राधान्याने मिळवून देणार असल्याची माहिती समृद्धी शुगर्सचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली आहे.
ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी मोफत एक क्विटल साखर योजना, शेतकऱ्यांचे शेतरस्ते स्वखर्चातून खुले करण्याची मोहीम आणि आशा व अंगणवाडी सेविकांच्या मुलींच्या लग्नासाठी २१ हजाराची मदत या अभिनव योजनेमुळे समृद्धी कारखाना लोकप्रिय झाला. आता शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपल्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी समृद्धी कारखाना पन्नास टक्के अर्थसहाय्य करणार आहे. विहीरीचे काम पूर्ण झाल्यावर शासनाच्या योजनेतून विजेसाठी सौर कृषीपंप आणि शेततळ्याचा लाभही मिळवून देण्यात येणार आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना अशा प्रकारे अर्थसहाय्य करणारा समृद्धी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. या योजनेच्या लाभासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी समृद्धी कारखान्याच्या कार्यालयात तसेच अंबड येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसेवा कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन सतीश घाटगे यांनी केले आहे.
हे शेतकरी योजनेसाठी असतील पात्र;
ही योजना समृद्धी कारखान्याच्या अल्पभूधारक ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी आहे. ज्यांच्याकडे ५ एकरापेक्षा कमी शेती आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. समृद्धी कारखान्याचे सभासद नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी समृद्धी कारखान्याचा सभासद जामीनदार म्हणून द्यावा लागेल. ५० फूट विहीर खोदण्यासाठी हे अर्थसहाय्य समृद्धी कारखाना करणार आहे. दोन वर्षात उसाच्या बिलातून या अर्थसहाय्याची परतफेड करण्याची सुविधा शेतकऱ्यांना कारखाना देणार आहे.
"कृषी हे शाश्वत उत्पन्नाचे साधन आहे. शेती समृद्ध झाल्याशिवाय तरुण पिढी शेतीकडे वळणार नाही. म्हणून घनसावंगी मतदारसंघातील शेती समृद्ध करण्यासाठी वीज, पाणी आणि रस्ते या मूलभूत सोयी सुविधा निर्माण करून देण्यासाठी कारखाना प्रयत्न करत आहे. ही योजना त्याचाच एक भाग आहे. केवळ विहिरीसाठी अर्थसहाय्य देऊन कारखाना थांबणार नाही. तर या शेतकऱ्यांना शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून शेततळे आणि सौर कृषी पंपाचा लाभही मिळवून देणार आहे".
- सतीश घाटगे,
(चेअरमन समृद्धी शुगर्स तथा भाजप नेते)